इस्लामपूर - श्री क्षेत्र वाटेगाव( ता वाळवा) येथील श्री वाटेश्वर मंदिरातील शिवलिंगास(पिंडीस) बुधवारी सूर्योदयावेळी ६वाजून ५५ मिनिटानी सूर्यकिरणांचा स्पर्श होऊन किरणोत्सव उत्सवास प्रारंभ झाला. याचा कालावधी २० मिनिटे होता. वाटेगाव येथे पुर्वाश्रमीची भोगावती नदी गावाच्या मध्यभागातून वहात आहे. नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर पुरातन हेमाडपंती श्री वाटेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुखी आहे. या मंदिराचे काम हेमाडपंती स्थापत्यशैलीचे असून मंदिराला पुर्व, दक्षिण, उत्तर तीन दरवाजे आहेत. मंदिराच्या गाभाऱ्यातील शिवलिंगापासून अंदाजे चाळीस फूट लांबीचा पुर्वाभिमुखी सभामंडप आहे. या सभामंडपातून आत गाभाऱ्यात असलेल्या शिवलिंगास बुधवार दि. २४ रोजी सूर्योदयावेळी सूर्यकिरणांचा स्पर्श होऊन किरणोत्सवास प्रारंभ झाला. हा किरणोत्सव ५ दिवस असेल असे पुजारी संदिप गुरव यानी माहिती दिली.
श्री वाटेश्वर मंदिरात किरणोत्सव उत्सवास प्रारंभ