पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर नोंदणी केल्याशिवाय चालू ठेवू नये - जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते

 पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर नोंदणी केल्याशिवाय चालू ठेवू नये




  - जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते


सांगली - प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अंतर्गत पाळीव प्राणी दुकान नियम 2018 आणि श्वान प्रजनन व विपणन नियम, 2017 या नियमातील तरतुदीनूसार राज्यातील पाळीव प्राण्यांची दुकाने तसेच श्वान प्रजनन व विपणन केंद्राची महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ पुणे यांच्याकडे नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये कोणतेही पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळ पुणे यांच्याकडे नोंदणी केल्याशिवाय चालू ठेवण्यात येवू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. ए. धकाते यांनी केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत यांनी आपल्याकडील कर्मचाऱ्यांची निरिक्षक म्हणून नेमणूक करावी व कार्यक्षेत्रात सुरु असलेल्या पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर्स यांना तात्काळ नोंदणी करुन घेण्यासाठी आदेशित करावे. तसेच संबंधित यंत्रणांनी अनोंदणीकृत पेट शॉप व डॉग ब्रीडिंग सेंटर तात्काळ बंद करण्याची कारवाई करावी, असे  आवाहनही डॉ. धकाते यांनी केले आहे.