स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला - डॉ. अभिजीत चौधरी

स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळा अन्यथा लॉकडाऊनचा पर्याय खुला - जिल्हाधिकारी 



सांगली - नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने स्वयंशिस्त पाळावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. त्यासाठी सार्वत्रिक सामाजिक दबाव निर्माण करावा. मास्क अनिवार्यपणे वापरावा. या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने, अनावश्यकपणे गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यास लॉकडाऊन हा अंतिम पर्याय राहील असे सांगून जिल्ह्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले. ताप, सर्दी, खोकला, डायरिया, स्नायूदुखी, मानसिक गोंधळलेली स्थिती आदि लक्षणे जाणवल्यास तात्काळ फिवर क्लिनिक, आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा.  50 वर्षावरील व कोमॉर्बिडिटी असणाऱ्या रूग्णांनी कोणतेही दुखणे अंगावर काढू नये. त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच खाजगी डॉक्टरांनी कोरोनाची लक्षणे असणारा रूग्ण तपासणीसाठी त्यांच्याकडे आल्यास त्वरीत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलकडे संदर्भित करावा. लवकर निदान झाल्यास लवकर उपचार सुरू होतील आणि पुढील दुष्परिणाम टाळता येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.


जिल्हाधिकारी कार्यालयात वृत्तपत्रांचे संपादक, आवृत्ती प्रमुख यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे उपस्थित होते.