वांगी येथे कोरोना रूग्ण सापडला सहाजण संस्थात्मक तर ३२ जण होमक्वारंटाईन : कंटेनमेंट झोन जाहीर

  • वांगी येथे कोरोना रूग्ण सापडला  सहाजण संस्थात्मक तर ३२ जण होमक्वारंटाईन

  •  कंटेनमेंट झोन जाहीर


 

 

कडेगाव - वांगी ( ता. कडेगांव ) येथे कोरोनाचा रोगाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर तब्बल ८० दिवसानंतर पहिला रूग्ण सापडला आहे. येथील ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे गावात खळबळ उडाली आहे. सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने वांगी गाव कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.

मंगळवार (दि.९) मे रोजी रात्री वांगी गावातील रहिवासी असणाऱ्या ६९ वर्षीय वृद्ध व्यक्तीस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. कन्टेन्मेंट झोनमुळे वांगी गावठाण मध्ये जाणारे रस्ते सीलबंद केले आहेत.

वांगी येथील ६९ वर्षीय व्यक्ती हे वांगी गावातीलच रहीवासी आहे. या व्यक्तीस गेल्या सात दिवसापासून अगंदुखी, ताप येत असल्यामुळे त्यांनी गावातील खासगी दवाखान्यात उपचार घेते होते. ताप कमी येत नसल्यामुळे त्यांना सोमवार (दि.८) कडेगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

        कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी या व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासनाने वांगी गाव कंटेन्मेंट झोन जाहीर केले असून गावात जाणारे मार्ग बंद केले आहेत. प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार डॉ.शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधव ठाकूर, डॉ.वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकुश इगंळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी वांगी येथे भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकानी घरोघरी सर्वे सुरू केला आहे. या रुग्णाच्या सपंर्कात आलेली त्याची पत्नीस मिरज येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

रूग्णाच्या संपर्कातील सहा जणांना वांगी येथील शासकीय निवासीय शाळेत संस्थात्मक क्वारंटाईन केले आहे. तसेच ३२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने तातडीने त्या भागात औषधाची फवारणी केली.