राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे "ऑनलाइन नोकरी महोत्सव' होणार .

                राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे "ऑनलाइन नोकरी महोत्सव' होणार .


                                         


नाशिक कोरोना संसर्गामुळे इतर राज्यांतील कामगार आपापल्या घरी गेले. त्याचा विपरीत परिणाम औद्योगिक क्षेत्रावर होत आहे. मनुष्यबळाअभावी उद्योगधंदे सुरू करण्यात अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत राज्यात मनुष्यबळ तयार व्हावे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे "ऑनलाइन नोकरी महोत्सव' होणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 10 जूनच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर शारीरिक अंतर पाळून रक्तदान शिबिर घेण्यात यावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 
औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्‍यकता.
महाराष्ट्रात मार्चपासून लॉकडाउन सुरू झाला. उद्योगधंदे बंद झाले. लॉकडाउनमध्ये उद्योगांना सवलत दिली आहे. मात्र, कामगार गावी गेल्याने उद्योग पूर्णक्षमतेने सुरू करण्यात अडचणी येत आहेत. त्याचअनुषंगाने होत असलेल्या ऑनलाइन नोकरी महोत्सवांतर्गत महाराष्ट्रातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर औद्योगिक कंपन्यांनाही मनुष्यबळाची आवश्‍यकता आहे. कष्ट करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम देण्याच्या हेतूने महोत्सव होत आहे. राज्यातील गरजू बेरोजगार युवक-युवतींनी या उपलब्ध होणाऱ्या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. इच्छुकांना नावनोंदणीसाठी https://forms.gle/xikubng6MBGTpPgp8 या लिंकवर माहिती द्यावी. 
सामाजिक बांधिलकी अधोरेखित. 

कोरोनाच्या संकटामुळे पक्षाचा 21 वा वर्धापन दिन सार्वजनिक व मोठ्या प्रमाणावर साजरा करता येत नसला, तरी वर्धापन दिनानिमित्ताने आपली सामाजिक बांधिलकी पार पाडण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण, रुग्णालयांची रक्ताची गरज लक्षात घेऊन लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पक्ष कार्यकर्त्यांनी स्वयंसेवी संस्था, नागरिकांच्या सहकार्याने राज्यभर रक्तदान शिबिरे घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तसंकलन करावे, असे श्री. पाटील व श्री. पवार यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांना रक्ताची फारशी गरज पडत नाही; परंतु राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या थॅलेसेमिया व अन्य रुग्णांना वेळोवेळी रक्ताची गरज भासते. ही गरज पूर्ण करण्यासाठी पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी पुढे यावे. स्वतः रक्तदान करावे व इतरांनाही रक्तदानासाठी प्रवृत्त करावे. रक्तसंकलनाच्या कार्यास हातभार लावावा, असे पक्षातर्फे आवाहन करण्यात आले आहे. राज्यावरील कोरोनाचे संकट आणि गेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाउनच्या काळात पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमांद्वारे केलेल्या जनसेवेबद्दल श्री. पाटील आणि श्री. पवार यांना कार्यकर्त्यांचे आभार मानलेत. समाजातील दुर्बल, वंचित घटकांना, तसेच अडचणीत असलेल्या बांधवांना पक्षीय व वैयक्तिक पातळीवर मदत करण्याची परंपरा यापुढेही कायम ठेवावी, असेही त्यांनी म्हटले आहे.