लाल परी चा स्टार्टर आता लागणार...आता प्रवास सुरू होईल.
लाल परी चा स्टार्टर आता लागणार...आता प्रवास सुरू होईल.

 

 

सांगली -  एसटी थांबली की सारं जग थांबल्यासारखं वाटलं. लाल परी रस्त्यावर धावायला लागली की आपलं जग धावायला लागतं. ही लाल परी गेल्या 60 दिवसांपासून बंद आहे. तीची चाकं थांबली आहेत... मात्र आता "हात दाखवेन, पण एसटीनंच जाईन', असं म्हणणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आली आहे.

एसटीचा स्टार्टर आता लागणार आहे. चाकं पुन्हा धावू लागणार आहे. सिंगल बेल, डबल बेलचा आवाज घुमणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी तसे आज पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.

 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एसटी वाहतूक शंभर टक्के बंद करण्यात आली होती. महाराष्ट्रांर्गत आणि परराज्यातही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गावांना जोडणारी, महानगरांकडे धावणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी एसटी आता पुन्हा धावणार आहे. अर्थात, खूप कडक नियमांसह ती धावेल. त्यात एसटीमध्ये प्रवेश करताना हातावर सॅनिटायझर घ्यावे लागणार आहे. एरवी एसटीची प्रवासी क्षमता ही 52 ते 55 इतकी असायची. ती आता निम्म्यावर येईल. एकाच आसनावर एकालाच बसता येईल. त्यामुळे मला "विंडो सीट मिळेल का?' अशी चिंता करण्याचे कारणच नाही. अर्थात, या नियमामुळे एसटीचे भारमान एरवीच्या सरासरी भारमानापेक्षा खूपच खाली येणार हे निश्‍चित आहे. त्यामुळे दरवाढ होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात, हा संपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अधिकारात आहेत. त्याबाबत कोणते आदेश येतात, याकडे लक्ष असेल.

 

सांगली जिल्हा एसटी विभागाने या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर उद्यापासून वाहतूक सुरळित करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे आता प्रवास सुरू होईल.