तुंगजवळ धक्कादायक प्रकार;लैंगीक अत्याचार करून चिमुरडीची हत्या- मृतदेह उसामध्ये छिन्नविछन्न अवस्थेत मिळाला

             सांगली  : तुंग (ता. मिरज)जवळील विठलाईनगर-चांदोली वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगीक अत्याचार करून तिचा  गळा आवळून निर्घृण खून केल्याचा प्रकार  उघडकीस आला. छिन्नविछन्न अवस्थेतील तिचा मृतदेह उसाच्या शेतात अढळून आला. ही चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानात खायला आणायला म्हणून गेली होती. रात्रीपासून  तिचा शोध सुरू होता. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा दुबुले, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक दंडीले  आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास तपास करण्याबाबत सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत संशयीताचा शोध सुरू होता.  
सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील तुंग जवळ विठलाईनगर ही चांदोली धरणग्रस्तांची वसाहत आहे. या वसाहतीत पहिलीत शिकणारी सात वर्षाची चिमुरडी बुधवारी सायंकाळी दुकानातून खायला आणायला जातो म्हणून गेली. त्यानंतर ती घरी  परत आली नाही. उशिर झाला तरी ती परतली नाही. त्यामुळे आई-वडील आणि घरचे तिचा शोध घेऊ लागले.   परिसरातील नागरिक देखील शोध घेत होते. जवळच्या शेतात देखील रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र  ती कोठे सापडली नाही.  गुरुवारी  सकाळी पुन्हा तिचा शोध सुरू केला. तेव्हा गावातील वासू पाटील यांच्या ऊसाच्या शेतात तिचा मृतदेह दिसला.  ही माहिती तत्काळ सांगली ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांनी पथकासह धाव घेतली. श्वान पथकालाही बोलवले.  स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिसही   तत्काळ घटनास्थळी आले. ऊसाच्या शेतात चिमुरडीचा मृतदेह पडला होता. प्राथमिक तपासात तिचा   गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या शिवाय तिच्या डोक्यात एक छोटीसी जखम आहे.   अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी घटनास्थळी पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.


 संशयतींचा शोध घेण्यासाठी पथके- अशोक वीरकर
तुंगजवळ घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. संशयीताचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करून पाठवण्यात आली आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लागून दोषीवर कारवाई होईल, असे पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी सांगितले.