कोल्हापुरला पावसाचा जोरदार दणका ; झाड कोसळून पेपर विक्रेत्याचा मृत्यू 


  • कोल्हापुरला पावसाचा जोरदार दणका ; झाड कोसळून पेपर विक्रेत्याचा मृत्यू   
 कोल्हापूर : आज सकाळपासून अंगाची लाही लाही होत असताना अचानकच ढगांच्या कडकडाटासह जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाने शहराला चांगलेच झोडपून काढले. यामध्ये टाकळा चौक येथील हिंद कन्या छात्र आवारातील पेपर विक्रेते सुरेश केसरकर यांचा घरावर झाड कोसळून जखमी झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. 


केरळमध्ये 1 जून आणि सिंधूदुर्गसह इतर जिल्ह्यात 9 ते 10 जूनपर्यंत मॉन्सून सक्रीय होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. दरम्यान, जिल्ह्यात आजच त्याचा प्रत्यय आला आहे. ढगांच्या कडकडाटासह जोरदार पडलेल्या पावसामुळे काही मिनिटात मान्सून सक्रीय झाल्याचे वातावरण दिसू लागले. कोल्हापूर शहरात दुपारी 2 : 35 मिनिटांनी पावसाला सुरुवात झाली. पंधरात ते वीस मिनिटातच शहरातील गटारी आणि रस्ते तंडुंब भरुन वाहू लागले. या पावसामुळे काही ठिकाणी झाडे कोसळली आहेत. केसरकर यांच्याही घरावर झाड कोसळले. यामध्ये केसरकर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू असताना सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. झाड कोसळल्याने केसरकर यांच्या राहत्या घराचे आणि प्रापंचिक साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे.


आठवडाभरापासून उन्हाची तीव्रता वाढली होती. यामुळे नागरिक हैराण झाले होते. आज सकाळपासूनच हवेतील उष्मा वाढला होता. त्यामुळे दिवसभरात पाऊस येणार याचा अंदाज नागरिकांनी बांधला होता. दुपारी आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली. ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस सुरु झाला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरभर पाणी साचले.