भिलवडी येथे होणार आठवडयातील दोनच दिवस भाजीपाला व फळ विक्री.

भिलवडी येथे होणार आठवडयातील दोनच दिवस भाजीपाला व फळ विक्री.


भिलवडी  - गावामध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी भिलवडी येथे भाजीपाला व फळ विक्री फक्त दोनच दिवस केली जाणार असून, गावांमध्येही फिरून विक्री करण्यास बंदी घालण्याचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये सर्वानुमते घेण्यात आला.
सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आल्यामुळे, जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिथिलता करण्यात आली आहे. सदरची शिथिलता  ही लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून देण्यात आली आहे. परंतु याचा लोक गैरफायदा घेत असून, सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठेमध्ये लोक अनावश्यक गर्दी करीत आहेत. याची गांभीर्याने दखल घेत भिलवडी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने गावांमध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्याकरिता भिलवडी येथील मुख्य बाजारपेठ व गावातून फिरून विक्री करणाऱ्या भाजीपाला व फळ विक्री व्यावसायिकांना आठवड्यातील फक्त दोनच दिवस सकाळी आठ ते दुपारी बारा पर्यंत आपल्या मालाची विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे सदरचे व्यवहार हे सोमवार व शुक्रवार या दोनच दिवशी सकाळी सात ते बारा यावेळी सुरू राहतील. त्याचबरोबर  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावावरून भाजीपाला व फळे विक्री करण्यासाठी येणाऱ्या फिरस्त्या व्यापाऱ्यांवर निर्बंध घालण्याचा निर्णय स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. त्याचबरोबर परजिल्हा व परराज्यातून आलेल्या लोकांना त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना शाळेमध्ये कॉरन्टाईन केले जाणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भिलवडीतील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानाबाहेर सॅनिट्रायझर, साबण व पाण्याची सोय करावी व इतरही उपाययोजना राबवाव्यात अशा सुचनाही स्थानिक आपत्ती व्यवस्थापण समितीच्या वतीने व्यापाऱ्यांना सुचना देण्यात आल्या. यावेळी भिलवडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास कोडग, भिलवडीचे सरपंच विजयकुमार चोपडे, जि.प. सदस्य सुरेंद्र भैय्या वाळवेकर, ग्रामसेवक आर.डी. पाटील, तलाठी  गौस महंमद लांडगे, उदयोजक गिरीष चितळे,चंद्रकांत पाटील, बाळासाहेब मोहिते, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रमेश पाटील, आरोग्य सेवक अमोल गुंडवाडे हे उपस्थित होते.