दारूड्या मुलाचा  डोक्‍यात दगड घालून खून.

  • दारू पिउन सतत घरी त्रास देत असल्याच्या कारणावरून डोक्‍यात दगड घालून खून.
  • दारूड्या मुलाचा  डोक्‍यात दगड घालून खून.


शिराळा - दारू पिउन सतत घरी त्रास देत असल्याच्या कारणावरून गजानन भगवान डांगे (वय 32) या दारूड्या मुलाचा वडील भगवान जगन्नाथ डांगे (वय 60) यांनी डोक्‍यात दगड घालून खून केला. आज दुपारी अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत गजाननची पत्नी दुर्गा डांगे हिने शिराळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गजानन हा गेले अनेक दिवस काम धंदा करत नव्हता. त्यास दारूचे व्यसन लागले होते. तो नेहमी दारू पिऊन आई वडील आणि पत्नीस शिवीगाळ करून मारहाण करत होता. सोमवारी त्याने पत्नीस मारहाण करून शिंगटेवाडी (ता. शिराळा) येथे माहेरी पाठवले होते. आज सकाळपासून तो दारूच्या नशेत होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तो नशेतच घरी गेला. आई वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी रागाच्या भरात वडील भगवान यांनी गजाननच्या डोक्‍यात दगड घालून खून केला.


खून केल्यानंतर भगवान स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाले. खून करून पोलीस ठाण्यात येत असताना वाटेत ते गजानानचा कायमचा काटा काढला असे बडबडत होते. पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतर त्यांना अटक केली आहे. शिराळा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. गजानन याच्या पश्‍चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे करत आहेत.