महाराष्ट्रातील तरुणांमध्ये  स्कील नाही : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण - जयंत पाटील

महाराष्ट्रातील तरुणांमध्ये  स्कील नाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण - जयंत पाटील

जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर डागली तोफ.


मुंबई दि. २७ मे - परप्रांतीय मजुर राज्याबाहेर गेले त्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, महाराष्ट्रातील तरुणांमध्ये ते स्कील नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणत असतील तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्कील इंडिया कार्यक्रम बिनकामाचा ठरला का?असा सवाल करतानाच देवेंद्र फडणवीस यांनी मराठी तरुणांचे मानसिक खच्चीकरण केले आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आणि विशेषतः मुंबईतील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असल्याच्या बातम्या काही जणांकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात आल्या. खरंतर देशामध्ये कोरोनासंदर्भात सगळ्यात चांगलं काम महाराष्ट्रात सुरू आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा महाराष्ट्रातील आकडा बराच वाढलेला असेल असा अंदाज केंद्रसरकार आणि जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला होता. मात्र राज्य सरकारने वेळीच उपाययोजना केल्या म्हणून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली नाही अशी माहितीही जयंत पाटील यांनी यावेळी दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोवीड योध्दांना भक्कम पाठिंबा देतील असं वाटलं होतं. पण ते वेळोवेळी कोरोनाशी लढा देणाऱ्यांचा अपमान करत आहेत. उलट महाराष्ट्र बचाओ आंदोलन करून कोवीड योध्दांच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचे काम भाजपने केल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी केला. भाजपने परप्रांतीय मजूरांना घरी नेले असेही फडणवीस म्हणाले, मात्र या सर्वांच्या प्रवासासाठीचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले गेले. भाजपने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक पैसा दिला नाही. राज्याला पैसा न देता केंद्राला निधी देणारा भाजप महाराष्ट्राचा शत्रू आहे का असा आता प्रश्न पडलाय असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.