खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची लॉकडाउन असतानाही भव्य स्वागत रॅली : पोलिस निलंबित.


  • खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची येरवडा कारागृहातून सुटका.
  • लॉकडाउन असतानाही त्यांची भव्य स्वागत रॅली.
  • पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिस निलंबित.  •  


पिंपरी : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची येरवडा कारागृहातून सुटका झाल्यानंतर लॉकडाउन असतानाही त्यांची भव्य स्वागत रॅली काढण्यात आली. या रॅलीत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍तालयातील गुन्हे शाखेच्या पोलिस कर्मचारीही होता. रॅलीतील मोटारीत पोलिसांना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडली. दरम्यान, या रॅलीत सहभागी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी सेवेतून निलंबित केले आहे. 


शरीफ बबन मुलाणी (वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे निलंबित केलेल्या पोलिसाचे नाव असून, तो गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडाविरोधी पथकात कार्यरत होता. शुक्रवारी (ता. 29) रात्री खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी समीर मुलाणी व जमीर मुलाणी यांची येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटका करण्यात आली. या दोघांची सुटका होणार असल्याने त्यांचे पिंपरी चिंचवड, मुळशी, भोसरी अणि चिखली परिसरातील भाऊ, नातेवाईक आणि मित्र येरवडा कारागृह परिसरात एकत्र आले होते. आरोपी हे कारागृहातून बाहेर पडल्यानंतर 20 ते 25 दुचाकी व चारचाकी वाहनांतून रस्त्याने आरडाओरडा करत निघाले. दुचाकी व चारचाकी मोटारीतून मोठी रॅली काढण्यात आली. ही रॅली विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोरून समोरून जात असताना हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्यांना फुलेनगर याठिकाणी अडवले. 


रॅलीत असलेल्या चारचाकी गाडीतून एक गावठी बनावटीचे पिस्तूल, काडतुसे व लोखंडी बार, अशी शस्त्रे जप्त करण्यात आली. यामुळे विश्रांतवाडी पोलिसांनी शरीफ मुलाणी याच्यासह आझाद शेखलाल मुलाणी (वय 30, रा. तळवडे चिखली), आदेश दिलीप ओकाडे (वय 21 रा. सुयोगनगर, निगडी), मुबारक बबन मुलाणी (वय 38 रा. मोरेवस्ती चिखली), संदीप किसन गरुड (वय 40 रा. तळेगाव दाभाडे), हुसेन जाफर मुलाणी (वय 43), सिराज राजू मुलाणी (वय 22) आणि विनोद नारायण माने (वय 26 तिघेही रा. कोळवण मुळशी) यांना अटक केली. 


या आरोपींवर आर्म ऍक्‍टसह लॉकडाउनच्या काळात बेकायदा जमाव जमवून रॅली काढल्याप्रकरणी राष्ट्रीय आपत्ती कायदा आणि महाराष्ट्र कोविड 2019 नुसारही गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, मुलाणी हा खुनातील आरोपीच्या रॅलीत सहभागी झाला. यासह बेकायदेशीररित्या पिस्तूल व काडतुसे बाळगल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांनी मुलाणी याला सेवेतून निलंबित केले आहे.