दस्त नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करा.

दस्त नोंदणी ऑनलाईन पद्धतीने करा.


चंदन चव्हाण.


सांगली -  शासनाने ऑनलाईन दस्त नोंदणी करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज नाही. नागरिकांनी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर जात 'ई रजिस्ट्रेशन'च्या माध्यमातून दस्त नोंदणी करावी असे आवाहन गुंठेवारी चळवळ संघर्ष समितीचे अध्यक्ष चंदन चव्हाण यांनी केले आहे. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेलच याशिवाय दुय्यम निबंधक कार्यालयात गर्दीही होणार नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 


       कोरोना विरोधातील लढाई लढत असतानाच शासनाने आर्थिक स्तरावर महत्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने राज्यात स्थावर (प्रॉपर्टी) खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करून त्यांची नोंदणी पूर्ववत ऑनलाईन पद्धतीने करण्यास परवानगी दिली आहे. याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले, शासनाच्या निर्णयामुळे दस्त नोंदणीसाठी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. नागरिकांनी  नागरिकांनी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर जात 'ई रजिस्ट्रेशन'च्या माध्यमातून दस्त नोंदणी करावी. 


      ई रजिस्ट्रेशन मुळे नागरिकांना इंटरनेटच्या माध्यमातून घर बसल्या दस्त करता येतो. दस्तातील सर्व पक्षकार एकाच ठिकाणी हजर असण्याची गरज नसल्याचे सांगत चव्हाण म्हणाले, डिपॉझिट ऑफ टायटल डीड पदधतीने झालेल्या कर्जव्यवहारामध्ये, उभय पक्षामध्ये करारनामा निष्पादित करण्यात आला नसेल, तर कर्जदाराला त्या कर्जव्यवहाराची माहिती नोटिसव्दारे संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयास सादर करावी लागते. सदर नोटीस फायलिंग करण्यासाठी नागरिकांना दुय्यम निबंधक कार्यालयात न जावे लागता बँका तसेच वित्तीय संस्था यांच्या शाखेतूनच सदर कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करता येते.  


      यासाठी ई-फायलिंग ही सुविधा नोंदणी व मुद्रांक विभागाने सर्व बँक अथवा वित्तीय संस्था यांना उपलब्ध करुन दिली आहे. तथापि, ज्या बँका किंवा वित्तीय संस्था सदर प्रणाली मध्ये सहभागी झाल्या नाहीत, त्यांचे कर्जदारांना नोटिस फायलिंगची कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊनच पूर्ण करावी लागते. त्या कर्जदाराने दुय्यम निबंधक कार्यालयात समक्ष जाण्यापूर्वी त्या नोटिस संदर्भातील माहिती नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर  उपलब्ध असलेल्या 'पीडीई फॉर फायलिंग या सुविधेचा वापर करुन ऑनलाईन भरणे क्रमप्राप्त असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले आहे.