पुणे : देहू परिसर सील; निर्बंध अधिक कडक

पिंपरी-चिंचवड - शहरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढू लागल्याने शहर सील करण्यात आले आहे. सीमावर्ती भागातील निगडी परिसरात संशयित रुग्ण आढळल्याने पालिकेच्या सीमेलगतचा देहू आणि देहू रोड परिसर कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला.


देहू आणि देहूरोड लगतच्या पिंपरी-चिंचवड पालिका परिसरात तोरणाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी हा परिसर सील करण्यात आला असून खबरदारीचा उपाय म्हणून सिमेलगतचे पाच किलोमीटरचे क्षेत्र बफर झोन जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर यांनी देहू ग्रामपंचायत आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला बुधवारी कंटेनमेंट झोन जाहीर केले आहे.


कंटेनमेंट झोन जाहीर झाल्याने या परिसरातील निर्बंध अधिक कडक होणार आहेत. देहू आणि देहूरोड मध्ये येणारे व जाणारे सर्व मार्ग सील केले जाण्याची शक्यता आहे. या मार्गावरून विनाकारण प्रवास करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच कुठल्याही कारणास्तव रस्त्यावर येऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.


केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी आहे. मात्र या सवलतीचा फायदा घेऊन लॉकडाऊनच्या काळात अनेक जण विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. खरेदीच्या नावाखाली दुकानांसमोर गर्दी केली जात आहे. त्याची दखल घेऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी बुधवारी तडकाफडकी सूचना जारी करून २५ तारखेपर्यंत शहरातील किराणा, बेकरी, भाजीपाला, फळे आदींच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. केवळ दूध, औषधे आणि रुग्णालयांना त्यातून सूट देण्यात आली आहे.