पलूस तालुक्यातील माळवाडी तीन मे पर्यंत लॉक डाऊन.

पलूस तालुक्यातील माळवाडी तीन मे पर्यंत लॉक डाऊन.


   पलूस -  नुकतीच माळवाडी तालुका पलुस येथे स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक संपन्न झाली. यामध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, कडक उपायोजना करून सध्या सुरू असलेला लॉक डाऊन तीन मे पर्यंत ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. पलूस तालुक्यातील भिलवडी, अंकलखोपच्या पाऊलावर पाऊल टाकत माळवाडी गावाने देखील गावात येणारे सर्व अंतर्गत रस्ते बंद करून, माळवाडी गाव ३ मे पर्यंत लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला.कोरोनाचा शिरकाव माळवाडी सह परिसरात होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून माळवाडी येथील स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीने भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक कैलास कोडग यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यावेळी सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेला लॉक डाऊन तीन मे पर्यंत जैसे थे ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. यामध्ये मेडिकल व वैद्यकीय सेवा नियमित वेळेत सुरू राहतील त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेमध्ये असलेली दुकाने व इतर सेवा या सकाळी आठ ते दहा या वेळेतच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये किराणा होलसेल व किरकोळ विक्रेते, भाजीपाला बैठे विक्रेते त्याचबरोबर फिरून भाजीपाला व फळे विक्री करणारे व्यवसायिक यांनी देखील सकाळी आठ ते दहा यावेळेतच आपला व्यवसाय सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपाला व फळ विक्रेत्यांना लॉक डाऊन काळात गावांमध्ये फिरून विक्री करण्यास मज्जाव करण्याचेही ठरले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावावरून माळवाडी मध्ये येणाऱ्या लोकांना विलगीकरण करण्याचाही निर्णय घेण्यात आला. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आला. यावेळी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग,स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माळवाडी गावचे सरपंच बाळकृष्ण जाधव, उपसरपंच जनार्दन साळुंखे , ग्रामसेविका जी.टी.चौगुले,तलाठी गौसमहंमद लांडगे, गजानन मोहीते, भाऊसाहेब रुपटक्के,पोलीस पाटील अशोक तावदर, आरोग्य सेविका-बी. एम. चौगुले , आरोग्य सहाय्यक-भंडारे,अंगणवाडी सेविका राजश्री थोरात,कृषी सहाय्यक पूनम जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.