भिलवडी परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान.. शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण...

भिलवडी  - २०१९ मध्ये आलेला महापुर व सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अस्मानी संकटाचा सामना करावा लागत असून,भिलवडी आणि परिसरामध्ये आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यासह सर्वसामान्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
    भिलवडी आणि परिसरामध्ये आज दुपारी चार वाजता अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह दमदार पावसामुळे भिलवडी, माळवाडीसह परिसपरिसरामध्ये शेतकऱ्यासह सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठीक ठिकाणी मोठ मोठी झाडे रस्त्यावर पडलेली होती. तर काही ठिकाणच्या विद्युत तारा व केबल वायर देखील  तुटल्या होत्या . बऱ्याच ठिकाणी घराची कौले, घरावरील पत्रे वाऱ्यामुळे उडून गेले आहेत त्यामुळे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी साचले होते. विद्युत तारे वरती झाडे पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित करावा लागला. त्याचबरोबर भिलवडी अंकलखोप रस्त्यावर नदी पुलाजवळील एक मोठे झाड रस्त्यावरती पडल्यामुळे बराच वेळ रस्त्यावरती ट्रॅफिक  जाम झाले होते. ट्रॅफिक जाम झाल्यामुळे, रस्त्याच्या दुतर्फा लांबपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. परंतु प्रशासनाने तातडीने सदरची झाडे जे.सी.बी.च्या साहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. ऑगस्ट२०१९ मध्ये आलेला महापूर त्याच वेळी पावसाळा संपल्यानंतरही बराच काळ तळ ठोकून बसलेला अवकाळी पाऊस व कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेला लॉकडाऊन यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यावर वादळी वाऱ्यासह अचानक आलेल्या पावसामुळे द्राक्ष बागायतदार, फूल उत्पादकासह भाजीपाला उत्पादकावरही अस्मानी संकट ओढवले आहे. वारंवार विविध रूपाने येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे कृष्णाकाठचा शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.