भिलवडीतील शेतमजूर महिलांनी केली मुख्यमंत्री सहायता निधीस मदत.


भिलवडीतील शेतमजूर महिलांनी केली मुख्यमंत्री सहायता निधीस मदत.



भिलवडी -  पोटाची खळगी भरण्यासाठी, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मोल मजूरी करणाऱ्या भिलवडी साठे नगर येथील महिलांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटाला चिमटा घेत, कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीस सहकार्य करण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, नुकतीच मुख्यमंत्री सहायता निधीस आर्थिक मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.
भिलवडी तालुका पलुस येथील साठे नगर मध्ये बहुतांशी मजूर वर्ग राहतो. नोकरीला असणाऱ्यांची संख्या अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत आहे. काही जणांची स्वतःची शेती अत्यल्प आहे तर काहीजण भूमीहीन आहेत. त्यामुळे शेतीतून मिळणारे उत्पन्न देखील तोकडेच आहे. सध्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशांमध्ये लॉक डाऊन सुरू आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे मोठ्या प्रमाणावर होत आहे. काही शेतमजूर दुसऱ्याच्या शेतामध्ये मिळेल ते काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत आहे. तर काहीं लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे. अशा परिस्थितीत एरवी नैसर्गिक आपत्ती वेळी इतरांकडून जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची अपेक्षा करणाऱ्या साठे नगर येथील मागासवर्गीय वस्तीतील, शेतमजूर सुमारे ५१ महिलांनी सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या  संकटांमध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीस आपला एक दिवसाचा पगार दिला आहे. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी असून, त्यांनी इतर सामाजिक संघटना , विविध मंडळे यांच्यापुढे एक आदर्श ठेवला आहे. भिलवडी सारख्या ग्रामीण भागातून मुख्यमंत्री सहायता निधीस शेतमजूर महिलांनी केलेली मदत ही खरच अनमोल असून, स्तुत्य प्रिय बाब आहे.