अंकलखोपमध्ये येणारे सर्व रस्ते ग्रामस्थांनी केले बंद.


     


अंकलखोपमध्ये येणारे सर्व रस्ते ग्रामस्थांनी केले बंद.



  • कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्थांनी उचलली कडक पावले.


     अंकलखोप - कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अंकलखोप येथील स्थानिक प्रशासनाने आज पर्यंत अनेक उपाय योजना केल्या आहेत. त्यात ते यशस्वी देखील झाले आहेत. परंतु गावातून अत्यावश्यक सेवा वगळता होणारी इतर अंतर्गत वाहतूक वाढली होती. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी कडक पावले उचलत, अंकलखोप गावी येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले.
          सांगली शहरांमध्ये कोरोनाने शिरकाव केला आणि ग्रामीण भागातील लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे सांगली जिल्ह्याला थोडासा दिलासा मिळाला परंतु खबरदारीचा उपाय म्हणून अंकलखोप येथील ग्रामस्थांनी अंकलखोप गावांमध्ये येणारे सर्व रस्ते बॅरिकेट्स लावून बंद केले. आष्टा इस्लामपूरहुन भिलवडी कडे  येणारा मुख्य रस्ता अंकलखोप पेट्रोल पंपा जवळून जातो. या रस्त्यावर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर प्रवास करणारे लोकं अंकलखोप येथील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करत होते. ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर बाहेर गावावरून अंकलखोप मध्ये येणाऱ्या पलुस,आमणापूर पुल व औदुंबर कडील रस्त्यावर, नागठाणे फाटा रस्त्यावर, तसेच शिव रस्ता,सुभाष नगर रस्ता, दौलत नगर रस्ता ,पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरुन परगावाहून  येणाऱ्या लोकांना गावांमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यासाठी ग्रामस्थांनी अंकलखोपमध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यावरती बॅरिकेट्स उभारून सर्व रस्ते बंद केले आहेत.