सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम दाखल.
सांगलीच्या कृष्णा पात्रात आज एनडीआरएफकडून पाहणी करण्यात आली. तसेच संपूर्ण पात्रात फेरफटका मारत सूचना केल्या.
सांगली - महापूराच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने यंदा जय्यत तयारी केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून महापूर बांधित जिल्ह्यात कोरोनाबरोबरच आपत्ती व्यवस्थापनला महत्व दिलेले आहे. सांगली जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम दाखल झालेल्या आहेत. त्यातील एक टीम सांगली शहरात तर दुसरी टीम आष्टा ( ता. वाळवा) येथे तैनात ठेवलेली आहे.
राज्य सरकारने यंदा महापूराची मोठी काळजी घेतलेली आहे. गेल्या चार दिवसापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडला आहे. चांदोली धरण परिसरातही सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी होत आहे. चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिली तर कोयना धरणातून आज सायंकाळपासून दोन ते 5 हजार क्युसेकने विसर्ग केला जाईल, असे प्रशासनाने जाहिर केले आहे. दरम्यान, चांदोली धरण परिसरात आज तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले. सकाळी आठ वाजेपर्यंत 165 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी गेल्या 24 तासात 10 फुटावरुन 23 फुटापर्यंत वाढली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन टीम दाखल झाल्या आहेत.