मुंबई महापालिकेसमोर मोठे संकट : १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अचानक गायब.

मुंबई महापालिकेसमोर मोठे संकट : १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अचानक गायब.


मुंबई : राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढू लागले असून मुंबई मोठा हॉटस्पॉट बनली आहे. एकट्या मुंबईतच कोरोनाग्रस्तांचा आकडा २१ हजारावर गेला आहे. यामुळे आधीच तणावात असताना मुंबई महापालिकेसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. तब्बल १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अचानक गायब झाले आहेत. कोरोना व्हायरची चाचणी घेताना त्या व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी गोष्टी घेतल्या जातात. काही जण याची खरी माहिती देत नाहीत. किंवा टेस्टिंग लॅबमध्ये कर्मचाऱ्यांकडून ही माहिती भरताना चूक होते. अशावेळी तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आढळल्यास त्याला शोधताना नाकीनऊ येत आहेत. असाच धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. 


अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी मुंबई मिररला सांगितले की, मुंबईमधून १०० हून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाले आहेत. त्यांनी चुकीची माहिती दिल्याने शोधणे कठीण झाले आहे. अशा लोकांना ट्रॅक करण्याचे अन्यही मार्ग आहेत. बांद्र्याच्या एका कंपनीने कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली होती. मात्र, पत्ता देताना बांद्रा पूर्व असा उल्लेख केला होता. मात्र, ही कंपनी पश्चिमेची होती. अशा बेपत्ता लोकांची नावे पाठवून मुंबई महापालिकेने आधारचे डिटेल्स मागविले असल्याचे त्यांनी सांगितले.  विक्रोळीच्या एन वॉर्डमध्ये कोरोनाचे  १२ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. अधिकारी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. खासगी लॅबमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. अंधेरी पूर्वमध्ये तर २७ जण बेपत्ता झाले आहेत, असे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळ यांनी सांगितले. धारावीमध्ये तर २९ जण बेपत्ता झाले आहेत. मात्र, यापैकी काही जणांना शोधण्यात यश आले आहे.