कोरोनाला येथे कोण भीत नाही.., जोपर्यंत  तो आपल्या भागात येत नाही.

  •  कोरोनाला येथे कोण भीत नाही.., जोपर्यंत  तो आपल्या भागात येत नाही.

  •  शिथिलता म्हणजे स्वातंत्र्यच लोकांच्या मनात भ्रम .


   भिलवडी - केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आला आहे. त्यामुळे चार मे पासून सांगली जिल्ह्यामध्ये लॉक डाऊनच्या नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. लोकांच्या सोयीसाठी देण्यात आलेल्या या शिथलतेचा अनेक जण गैरवापर करताना दिसून येत असून, विनाकारण लोक रस्त्यावरती येत असल्याने कोरोनाला येथे कोण भीत नाही.., जोपर्यंत कोरोना आपल्या भागात येत नाही अशी लोकांची मानसिकता झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये १७ मे पर्यंत लॉक डाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान देशातील जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून कोरोना व्हायरसच्या तीव्रतेनुसार देशामध्ये रेड, ऑरेंज व ग्रीन झोन बनवण्यात आले. लहान-मोठ्या व्यवसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा फैलाव होवू नये म्हणून काही उपाय योजना राबविण्याच्या अटीवर काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. परंतु सदर बाबींचा फायदा करून घेण्यापेक्षा बहुतांश लोक गैरफायदाच जास्त घेत आहेत. असे चित्र सर्वत्र बघायला मिळत आहे. भिलवडी येथे व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपले व्यवहार सकाळी आठ ते बारा या वेळेत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भिलवडी येथे परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे परिसरातील गावातील लोक मोठ्या प्रमाणात भिलवडी येथे येत आहेत. परिणामी रस्त्यावरती जणू काही आठवडी बाजारच भरला आहे, असे चित्र दिसत आहे. यामध्ये कामाशिवाय , टाईमपास म्हणून बाजारपेठेसह सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. यामध्ये अनेक जण तोंडाला मास्क न लावता मुक्तपणे फिरत आहेत. यांच्या मनामध्ये कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कोणतेही भय दिसत नाही. छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी आपल्या दुकानासमोर गर्दी होऊ नये, याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या आहेत. मास्क, सॅनिट्रायझरचा  वापर करणे बंधनकारक केले आहे परंतु ग्राहकच त्यांना योग्य प्रतिसाद देत नाहीत, त्यामुळे अनेक दुकानांच्या समोर लोकांची गर्दी बघायला मिळत आहे. शासनाने शिथिलता दिली म्हणजे जणू काय मुक्तपणे संचार करण्याला हिरवा कंदीलच दिला असल्याच्या भ्रमात लोक वावरत आहेत. यामुळे ठिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कोरोनाला इथे कोण भीत नाही..., जोपर्यंत कोरोना आपल्या भागात येत नाही अशी मानसिकता लोकांची झाली आहे.