खबरदारी म्हणून महापालिकेकडून सांगली मधील ती बँक सील.

खबरदारी म्हणून महापालिकेकडून सांगली मधील ती बँक सील.


बँकेतील सीसीटीव्ही मनपाच्या पथकाने घेतले ताब्यात. आयुक्तांची कारवाई.


सांगली : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर तो ज्या बँकेत कामास होता त्या बँकेला खबरदारी म्हणून सील करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानेही कारवाई करण्यात आली आहे. बँक सील करण्यापूर्वी मनपाच्या पथकाने या बँकेतील 8 एप्रिल ते 18 एप्रिल अखेरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेले आणि बँकेत दैनंदिन येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची तपासणी केली जाणार आहे.
    शनिवार विजयनगर येथील एका बँक कर्मचाऱ्या कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रविवार पासून मनपा प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व उपाय हाती घेण्यात आले होते. यामध्ये तो रुग्ण ज्या बँकेत काम करीत होता त्या बँकेतील आणि कुटुंबातील व्यक्तींना खबरदारी म्हणून ताब्यात घेऊन कोरंटाईन करण्यात आले आहे. याचबरोबर आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार संबधित बँक परिसर आणि विजयनगर येथील राहत्या घराच्या परिसरात सुद्धा औषध फवारणीसह सर्व्हेला सुरवात केली आहे. याचबरोबर पीपी कीटचा वापर करून मनपाचे अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि प्रणिल माने यांनी पूर्ण बँकेची तपासणी केली. यामध्ये काही ग्राहकांची माहिती मनपाकडून ताब्यात घेण्यात आली होती. यानुसार 98 लोकांची लिस्ट मनपाला मिळाली होतो. आज आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सुचनेनुसार मनपाचे अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे व वरिष्ठ स्वच्छता निरिक्षक अविनाश पाटणकर आणि विक्रम घाडगे यांच्या पथकाने आज पटेल चौकातील ती बँक सील केली आहे. त्याच पद्धतीने खबरदारी आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुढील 14 दिवस बँक बंद ठेवण्याबाबतची नोटिससुद्धा चिटकवण्यात आली आहे. बँक सील करण्यापूर्वी मनपाच्या पथकाने बँकेतील 8 एप्रिल ते 18 एप्रिल या कालावधीमधील सीसीटीव्ही फुटेजचा डिव्हीआर सुद्धा ताब्यात घेतला असून या सीसीटीव्ही फुटेजवरून या बँकेत दैनंदिन कामकाज करणारे आणि अन्य नियमित ग्राहक यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर खबरदारी म्हणून आज दुसऱ्या दिवशीही प्रतिबंधिक क्षेत्रात घरसर्व्हे आणि औषध फवारणी नियमितपणे सुरू ठेवण्यात आली आहे.