सांगलीत करोनाने घेतला एकाचा बळी.

सांगलीत करोनाने घेतला एकाचा बळी.



संपर्कातील २७ जण क्वारंटाईन सांगली, मिरज सील.


सांगली - सांगलीतील विजयनगरमधील एका बॅक कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाला. संबंधित व्यक्तीला अत्यवस्थ वाटू लागल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना मिरज करोना सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. रविवारी पहाटे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु रविवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.


सांगलीत करोनाने शिरकाव केल्याने सर्वत्र घबराट निर्माण झाली होती. इस्लामपूर येथील करोना रुग्णांनी करोनावर मात केली होती. परंतु सांगलीत करोनाने शिरकाव करताच पहिला बळी घेतला आहे.  संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले त्यांचे कुटुंब, बँक कर्मचारी तसेच परिसरात राहणारे नागरिक असे एकूण २७ जणांना ताब्यात घेवून त्यांचे क्वारंटाईन करण्यात आले आहे.


इस्लामपूरनंतर सांगली शहरात करोनाने शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला सर्दी, ताप आणि घशात दुखण्याचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी एका खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते. परंतु त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने दि. १७ रोजी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार करून देखील त्यांचा बरे वाटत नसल्याने त्यांच्या घशातील व नाकातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते.  रविवारी सकाळी ते करोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. दिवसभर त्यांची प्रकृती गंभीर होती. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.